पुणे – रस्त्याकडेला पथारी व्यावसायिकांची अतिक्रमणे, भरीस भर म्हणून उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अनावश्यकपणे बॅरीकेडिंग करण्यात आले आहे. दत्तवाडी ते धायरी फाट्यापर्यंत रस्त्याबाजूला जागा मिळेल तिथे केलेले वाहनांचे पार्किंग यामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून हा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सोमवारपासून अतिक्रमण निर्मूलन कारवाईसह पुढील सात दिवस खड्डे, बॅरिकेडिंग काढण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या मदतीने रस्ता अरुंद असलेल्या ठिकाणी पार्किंग आणि हॉल्टिंगसाठी वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. ही माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. त्याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा झाली असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पथ, अतिक्रमण नियंत्रण तसेच वाहतूक नियोजन विभागाकडून एकच वेळी काम केले जाणार आहे. हा रस्ता आराखड्यात 32 मीटरचा असून अनेक भागांत भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे तो काही भागांत 32, काही ठिकाणी 24, तर काही ठिकाणी 26 ते 28 मीटर आहे. आता उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंस केवळ दहा मीटर रस्ताच शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वात आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे काढून मुख्य रस्त्यावर वाहतूकीसाठी जागा करून दिली जाणार आहे.
..तर अभियंत्याचे निलंबन
पुढील सात दिवसांत सिंहगड रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीची जबाबदारी पथ विभागावर असेल. त्या नंतर खड्डे आढळल्यास संबधित अभियंत्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. पोलिसांकडून या रस्त्यावर नो पार्किंगची कारवाई वाढविली जाणार आहे. ज्या भागात पुलाच्या कामासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, त्या भागांत वाहनांना रस्त्यांवर थांबण्यास मनाई केली जाणार आहे.