पुणे – वनविभागातर्फे शहरातील खराडी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर आरागिरणीवर (सॉ मिल) कारवाई करण्यात आली. यामध्ये 6 आरामशीन जप्त केल्या.
शहरातील जुना मुंढवा रोड, तुकाराम नगर, खराडी येथे बेकायदेशीर आरागिरणी सुरु असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार पुणे वनविभागातर्फे सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी इतर वनकर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आरागिरणीवरती कारवाई करण्यात आली. यामध्ये अशोक खाशाबा जाधव यांचे रोहित पॅकेजिंग, सुनील भास्कर निकम यांचे महाराष्ट्र पॅकेजिंग (पाटील बॉक्स), भावनाजी रावजी पटेल यांचे लक्ष्मी टिंबर यांचा समावेश आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, मयूर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वडगाव मावळ वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव तसेच पुणे, वडगाव मावळ, शिरोता व पौड वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी व स्थानिक पोलीस प्रशासन यांचे सहकार्याने पार पडली. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वन गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.