पुणे – वीजमीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रीडिंग घेतल्याने महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो.
हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे वीजमीटरचे अचूक रीडिंग घेण्यामध्ये हयगय आढळून आल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सीला आर्थिक दंडासह थेट काळ्या यादीत येईल, असा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला.
वीजमीटरमधील सदोष रीडिंग व चुका टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागअंतर्गत गणेशखिंड, रास्तापेठ व पुणे ग्रामीण मंडल तसेच सातारा, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली मंडलनिहाय मीटर रीडिंग एजन्सीच्या कंत्राटदारांची आढावा बैठक घेण्यात येत आहे.
पुणे येथील प्रकाशभवनमध्ये आयोजित गणेशखिंड मंडलमधील मीटर रीडिंग एजन्सीच्या कंत्राटदारांच्या बैठकीत नाळे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता शंकर तायडे व पंकज तगलपल्लेवार, उपमहाव्यवस्थापक एकनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत मीटर रीडिंगमध्ये होणाऱ्या चुका व सदोष रीडिंगबाबत उदाहरणांचे सादरीकरण करून विविध उपाययोजनांबाबत नाळे यांनी आदेश दिले.
पुणे प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, महावितरणने वीजमीटर रीडिंग मोबाइल ऍपद्वारे सुरू केल्यानंतर मीटर रीडिंगमध्ये अचूकता आली आहे. वीजग्राहकांना मीटर रीडिंगचे अचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असतानादेखील एजन्सीजच्या कामचुकार व निष्काळजीपणामुळे मीटरच्या रीडिंगमध्ये सदोषता किंवा चुका आढळून येत आहेत. त्या अजिबात सहन केल्या जाणार नाही. महावितरणकडून देखील एजन्सीजने घेतलेल्या मीटर रीडिंगची पडताळणी करण्यासाठी सरासरी 5 टक्के मीटर रीडिंगची तपासणी व पर्यवेक्षण करण्यात येत आहे.