पुणे – बेजबाबदारपणे कामे केल्यास कारवाई

मीनाक्षी राऊत यांचा संबंधितांना इशारा : अकरावीच्या आनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशिक्षण सुरू

पुणे – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी काळजीपूर्वक सर्व कामे पूर्ण करा. बेजबाबदारपणे व चुकीची कामे केल्यास संबंधित मुख्याध्यापकांसह इतर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोनप्रमुख, झोन सहायक, पर्यवेक्षीय अधिकारी, झोननिहाय संपर्क प्रमुख, तंत्रसहायक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ऍसेम्बली हॉलमध्ये अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रवेश नियंत्रण समितीतील सदस्य अशोक पानसरे, सचिन हलदुले, लिलाधर गाजरे, सुधीर भोसले, पर्यवेक्षीय अधिकारी आर.जी.जाधव आदी उपस्थित होते. एकूण नऊ झोन मधील सुमारे 1 हजार 200 अधिकारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्जात माहिती बरोबर भरली आहे का नाही याची व्यवस्थित तपासणी करावी लागणार आहे. सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केल्यानंतर प्रवेश दिले पाहिजेत. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांवर महाविद्यालयांचे पसंतीक्रम लादू नयेत. विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या पसंतीक्रमांनाच प्राधान्य देण्यात यावे. विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध करून द्याव्यात. पालक, विद्यार्थी यांच्यासाठी सभा घ्याव्यात, अशा सूचना राऊत यांनी दिल्या आहेत. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीट पूर्ण करावी. विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी त्या-त्या पातळीवरच दूर करा. विद्यार्थी मागदर्शन केंद्रांकडे पाठवू नका. चूकीचे ऍप्रूव्हल देण्याच्या प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शाळांमध्ये खेळांचे मैदान, पुरेशा वर्ग खोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी याबरोबरच आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. या सुविधांची तपासणी करुन त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्यात, असेही त्यांनी सांगितले आहे. इयत्ता बारावीसाठी महाविद्यालय बदल, शाखाबदल यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करून नये. या बदलांच्या ऑनलाइन नोंदीसाठी महाविद्यालयांना येत्या सप्टेंबरमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यावर माहिती अपडेट करावी. आता सर्व ऑनलाइनचा डेटा पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी जोडला जाणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.

नववीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्या
इयत्ता नववीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची येत्या जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्याच्या सूचनांची शाळांनी अंमलबजावणी करावी. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा. त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)