पुणे – तंत्रज्ञान प्रगत झाल्यापासून आर्थिक व्यवहारही आता मोबाईलवरून होतात. मागील काही दिवसांत ऑनलाईन व्यवसाय वाढला असून सहाजिकच त्यामुळे आर्थिक देवाण-घेवाण वाढली. मात्र ऑनलाईन व्यवहारात अनेकदा फसवणूक होते. त्यामुळे बँकांकडून वारंवार ऑनलाईन व्यवहार काळजीपूर्वक करण्याचं आवाहन केलं जातं. मात्र आता मोबाईल बँकींग वापरत नसतानाही एका व्यावसायिकाचं अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील वाकड येथील व्यावसायिकाला अज्ञात सायबर चोरट्यांनी तब्बल 38 लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी व्यावसायिक मोबाइल बँकिंगचा वापर करत नाहीत. तसेच त्यांनी कोणालाही ओटीपी अथवा मेल पाठवला नाही, असं असूनही त्याचं अकाउंट हॅक करण्यात आलं आहे.
अज्ञात भामट्यानं फिर्यादीच्या दोन अकाऊंटमधून तब्बल 38 लाख 4 हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी व्यावसायिकानं पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १७ जुलै रोजी उघडकीस आली.
फिर्यादीला १५ जुलै रोजी खात्यातून २ लाख १४ हजार रुपये वजा करण्यात आल्याचा मॅसेज आला होता. त्यानंतर त्यांनी बँकेत विचारपूस केली. तेव्हा त्यांच्या खात्यातून ३८ लाख ४ हजार रुपये हॅकर्सने लुबाडल्याचं लक्षात आलं.त्यांनी पोलिसांत तक्रार केली असून रक्कम कुठं गेली याचा शोध पोलीस घेत आहेत.