बिबवेवाडी, दि. 19 (हर्षद कटारिया) – कृष्णराव चिमनराव ढोले चौक परिसरातील कै. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाखाली वीजपुरवठा करणाऱ्या असलेल्या महावितरणचे तीन मोठे युनिट धोकादायक स्थितीत आहे. याकरिताचा संरक्षित तारेचा दरवाजा तोडून टाकण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. याच ठिकाणी मद्यपींनी अड्डा बनविला असल्याने मद्यपानानंतर नशेत येथे त्यांच्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे.
उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून 22 के.व्ही.चे हाय व्होल्टेज युनिट आहे. यातून गुलटेकडी, टिंबर मार्केट, स्वारगेट, महर्षी नगर, मुकुंद नगर, सॅलसबरी पार्क, घोरपडी पेठ, गुरुवार पेठ येथे वीजपुरवठा होतो. वीज पुरवठ्याचे इतके मोठ्या युनिटचा ताबा मद्यापींनी घेतला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर रात्री-अपरात्री, पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना या युनिटमध्ये दुरुस्तीसाठी यावे लागते, त्यातच अशा महत्त्वाच्या युनिटच्या जागेचा ताबा मद्यापींनी घेतल्याने मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे.
शिवाय, या ठिकाणी काचेच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच ओल्या पार्ट्यांमुळे साचलेल्या कचऱ्यातून मोठी दुर्गंधी सुटत आहे. अशा स्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
महावितरणचे कर्मचारी तातडीने कामे करून वीज पुरवठा सुरळीत करीत असतात. मात्र, मध्य शहरात कर्मचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीमध्ये काम करावे लागते तसेच वीजेचे इतक्या मोठ्या युनिटची सुरक्षा धोक्यात आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन येथे सफाई करून लोखंडी गेट बसवावे.
– गणेश शेरला, एकता प्रतिष्ठान
सफाईकडे दुर्लक्ष…
महावितरण कर्मचाऱ्याच्या देखरेखेखाली येथील क्षेत्रीय कार्यालयाकडून या जागेतील कचरा उचलणे तसेच सफाई करणे गरजेचे असताना याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कचरा उचलयाचा तरी कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उड्डाणपुलाखालील युनिटमध्ये ट्रिप झाल्यावर अनेक वेळा रात्री दुरुस्तीसाठी यावे लागते. मात्र, कचरा, दारूच्या बाटल्यांचा काचेचा खच व मद्यपींचा गोंधळ येथे सुरू असतो, अशा स्थितीत काम करावे लागते.
– सुधीर तनपुरे, तंत्रज्ञ, महावितरण
सदर जागी वीजेचे मोठे युनिट असून दुरुस्तीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांना जावे लागते. कचरा व मद्यपींचा वावर असल्याने दुर्घटना होऊ शकते आमची कोणा विरोधात तक्रार नाही. मात्र, स्वच्छता व सुरक्षा ठेवण्याकामी महापालिकेनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
– बबन धेंडे, अभियंता, महावितरण