पुणे, दि. 20 -पुणे शहरात रविवारी सकाळी नीचांकी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात सरासरीपेक्षा 4.6 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हंगामात प्रथमच एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी पुणे राज्यातील तिसरे सर्वांत थंड शहर ठरले.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवार (दि.22) पर्यंत अग्नेय बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणेकडील काही राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे शहर आणि परिसरात यंदाच्या हंगामात सातत्याने तापमानात कमी-जास्त होत आहे. यावर्षी शुक्रवारी (दि.18) शहरात 11.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामातील पुण्यातील हे नीचांकी तापमान ठरले होते. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात घट होऊन रविवारी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
शहरात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात देखील तीन अंश सेल्सिअसची घट झाली आहे. रविवारी दुपारी कमाल 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 48 तासांत शहरात अंशत: ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होऊन गारवा कमी होईल.