पुणे : मामाने बांधकाम साहित्य पुरविणारे दुकान भाच्याला चालवायला दिले होते. मात्र भाच्याने दुकानातील साहित्य परस्पर विकले, तसेच घरातील चेक स्वतःसाठी वापरून मामाची ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मागीलाल चुनाजी पुरोहित (वय-४४, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुलशी जीवराम पुरोहित (वय ३५, रा. हिंजवडी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१६ ते २०२२ या दरम्यानच्या काळात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मागीलाल पुरोहित आणि आरोपी तुलसी पुरोहित हे मामा भाचे आहे. मागीलाल यांचे आशापुरा स्टील हे बांधकाम साहित्य पुरविण्याचे दुकान आहे. मांगीलाल यांनी हे दुकान तुलशी पुरोहितला चालवायला दिले होते. आरोपी तुलसीने दुकानातील मालाची परस्पर विक्री करून त्यातून आलेले १५ लाख स्वतःकडे ठेवले. तसेच फिर्यादी यांनी घरामध्ये सही करून चेक ठेवले होते.
यातील ६ लाख २९ हजाराचे चेक परस्पर दुसऱ्याला देऊन टाकले. दुकानातील इतर माल विकून त्यातून आलेले २० ते २५ लाख ग्राहकांकडून रोख स्वरूपात घेऊन स्वतःकडे ठेवले. तर आरोपी तुलशीने इतर व्यापाऱ्याकडून ४५ लाखांची उधारी करून फिर्यादी यांची ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उसगावकर तपास करत आहेत.