पुणे -पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. पश्चिम रिंगरोड हा कळवडे (ता. भोर) ते उर्से (ता. मावळ) असा सुमारे 68 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या रिंगरोडवर 8 बोगदे असून सुमारे 13 किलो मीटरचा प्रवास हा बोगद्यातून होणार आहे. यामध्ये घेरासिंहगड ते कल्याण असा तब्बल 6 किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे.
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुढील वर्षात रिंगरोडसाठीच्या भूसंपादनांचे काम गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार आहे. भूसंपादनासाठी रिंगरोडच्या पश्चिम भागातील मार्गिकेच्या मोजणीचे काम 21 एप्रिल 2021 रोजी सुरू करण्यात आले. एकूण 37 गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. 36 गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी 950 हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. दरम्यान, या रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव सदाशिव साळुंखे यांनी काढले होते. त्या आदेशानुसार कोणत्या गावातील किती क्षेत्र या रिंगरोडमध्ये जाणार आहे, यांची माहितीदेखील देण्यात आली आहे. |
तसेच, जमिनीचे मूल्यांकन करण्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. भूसंपादनाचे दर जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष जमीन संपादनाचे काम सुरू होणार आहे. रिंगरोडवरील प्रवास वेगाने तसेच त्याची लांबी कमी असावी, यामुळे प्रवासाचा वेळसुद्धा वाचणार आहे. या उद्देशाने रिंगरोडवर 8 बोगदे असणार आहे. पश्चिम भागात डोंगर आहे. त्यामुळे डोंगराला वळसा घालून अथवा घाट करून रस्ता तयार करणे जिकिराचे होणार त्यामुळे आठ ठिकाणी बोगदे केले जाणार आहे.
असा असणार रिंगरोडचा मार्ग
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी धामणे बेबडओहोळ चांदखेड पाचाणे (ता. मावळ) पिंपळोली केमसेवाडी जवळ पडळघरवाडी रिहे मातेरेवाडी घोटावडे अंबडवेट भरे कासारआंबोली उरावडे आंबेगाव मारणेवाडी मोरेवाडी भरेकरवाडी कातवडी (ता. मुळशी) बहुली भगतवाडी सांगरुण मांडवी बुद्रुक मालखेड वरदाडे खामगाव मावळ घेरा सिंहगड मोरदरवाडी कल्याण रहाटावडे (ता. हवेली) रांजे कुसगाव खोपी कांजळे केळवडे (ता. भोर) येथील पुणे – सातारा महामार्गाला जोडला जाणार आहे.
रिंगरोडची प्रमुख वैशिष्ट्ये
पश्चिम रिंगरोडचे लांबी -68 किलो मीटर
रिंगरोड 110 मीटर रूंद म्हणजे सहा पदरी असणार आहे
एकूण बोगदे – 8
खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरून अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल
हा पूल वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक असणार आहे
एकूण छोटे पूल – 3
उड्डाणपूल – 2