सातारा – छत्रपती शिवरायांच्या वारसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना बचाव पक्षाचे वकील व सरकारी वकिलांमध्ये खडाजंगी झाली.
पोलिसांनी ऍड. सदावर्ते यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी सहावे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले. विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याने सरकार पक्षाने 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांचे व्हॉइस सॅम्पल, घटनास्थळाचा पंचनामा, हे वक्तव्य त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले, या बाबींचा तपास करायचा असल्याचे लेखी म्हणणे मूळ तक्रारदार राजेंद्र निकम यांच्या वकिलांनी सादर केले.
सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्यावतीने सर्व मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न झाला. ऍड. सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये दोन वेळा खडाजंगी झाली. खा. उदयनराजे यांचा पराभव का झाला, असा मुद्दा बचाव पक्षाने मांडल्यावर सरकार पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे बचाव पक्षाच्या वकिलांनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागितली. ऍड. सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने, न्यायालय व शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचा दोन वर्षे पाठपुरावा करणाऱ्या राजेंद्र निकम यांनी न्यायालयाच्या आदेशाबाबत समाधान व्यक्त केले. सुनावणी संपल्यावर न्यायालयाच्या बाहेर येताच ऍड. सदावर्ते यांनी हात उंचावून, कष्टकऱ्यांसाठी संघर्ष सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली.