पुणे/मंचर – बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी आयोजकाने 50 हजार रुपयांची ठेव जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवून नियम आणि अटींचे पालन करण्याची हमी दिल्यानंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली जाणार आहे. प्राणी, गाडीवान आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल. आयोजकांनी अहवाल, आयोजनाचे चित्रीकरण इत्यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट
केले आहे.
कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांनी 11 ऑगस्ट 2017 रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार अधिसूचना जारी केली. तीच अधिसूचना पुन्हा न्यायालयाने जारी केली आहे. त्यानुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू इच्छिणारा कोणताही आयोजक, बैलगाडी शर्यत आयोजित करण्याच्या किमान 15 दिवस अगोदर प्रत्येक बैलगाडी शर्यतीकरीता बॅंक हमीच्या स्वरूपात किंवा मुदतठेव पावतीच्या स्वरूपात पन्नास हजार रुपये ठेवीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करील. प्रमाणित कारणासाठी ही ठेव जिल्हाधिकारी जप्त करू शकतील. अधिकारी शर्यतीची जागा तपासणी करता येईल. ते याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. शर्तींना अधीन राहून बैलगाडी शर्यत आयोजित करण्याची परवानगी कामकाजाच्या सात दिवसांच्या आत देईल.
15 दिवसांत व्हिडिओ सादर करणे अनिवार्य
आयोजकांनी अहवाल, आयोजनाचे चित्रीकरण, इत्यादी सादर करणे. आयोजक, स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, बैलगाडी शर्यतीचा पूर्तता अहवाल आणि संपूर्ण आयोजनाचे डिजीटल स्वरुपातील चित्रीकरण बैलगाडीची शर्यत समाप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.