मिरवडीचे सरपंच शेलार व शिवनेरी उद्योग समूहामार्फत उपक्रम
राहू – अजूनही ग्रामीण भाग म्हटले की बाई माणसावर एक वेगळीच अलिखित जवाबदारी असते. त्या जबाबदारीतून त्यांना कधी सुट्टी मिळत नाही. ग्रामीण भागातील अनेक महिलांना आपले दैनंदिन काम, शेती, कुटुंब सांभाळत असताना आवर्जून कधी स्वतःसाठी वेळ काढणे शक्य होत नाही. परंतु यापासून थोडासा विरंगुळा देण्याचे काम मिरवडीचे सरपंच सागर शेलार व शिवनेरी उद्योग समुहामार्फत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.शेलार यांच्या वतीने 200 हून अधिक महिलांना बाईपण भारी देवा हा चित्रपट दाखविण्यात आला.
मिरवडी येथील उपक्रमशील युवा सरपंच सागर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी वृक्षलागवड, अनाथाश्रम येथे मदत, खाऊवाटप, रक्तदान आदी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मागील वर्षांपूर्वी मिरवडी येथे सरपंच शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त रायबा मंदिर परिसरात चिंचबन तयार करण्यात आले.
यावेळी वाढदिवसानिमित्त सागर शेलार यांच्या संकल्पनेमधून व शिवनेरी उद्योग समूहाचे संस्थापक सोमनाथ रघुनाथ शेलार यांच्या सौजन्याने एक वेगळेच नियोजन करण्याचे ठरले. गावातील सर्वच महिलांना चित्रपट पाहण्याची संधी देण्यात आली. यापैकी इच्छुक असणाऱ्या गावातील 200 हून अधिक महिलांना सध्या चर्चेत असलेला मराठी चित्रपट बाईपण भारी देवा हा महिलांचा महिलांसाठी असणारा चित्रपट दाखविण्याचे नियोजन चंदननगर खराडी येथे बॉलीवूड सिनेमा चित्रपटगृहात करण्यात आले होते.
यावेळी चित्रपटाचे तिकीट, प्रवास व नाष्ट्याची सोय शिवनेरी उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली होती. रोजरोजच्या कामाव्यतिरिक्त मनोरंजन झाल्यामुळे या सर्व महिला या प्रचंड आनंदी झाल्याचे दिसून येत होते. यावेळी सर्व महिलांनी सरपंच सागर शेलार यांचे आभार मानले.