पुणे – खासगी टॅक्सी चालकांच्या भाडेवाढीबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात टॅक्सी चालकांची बैठक झाली. यावेळी खासगी वातानुकुलित (एसी) टॅक्सी चालकांना २५ टक्के भाडेवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच एसी टॅक्सी चालकांना २५ टक्के भाडे वाढ देण्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे आरटीओ अधिकार्यांनी सांगितले.
ऑनलाइन सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांना भाडेदर वाढवून मिळावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्यासह शहरातील विविध टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत टॅक्सी संघटनांच्या पदाधिकार्यांनी भाडेवाढ मिळावी, अशा मागणीचा जोर धरला.
मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय आरटीए घेणार आहे. टॅक्सी चालकांचा भाडे वाढीचा प्रस्ताव आगामी काळात त्यांच्यासमोर मांडण्यात येईल. ऑनलाइन सेवा देणाऱ्या खासगी टॅक्सी चालकांना ही किंमत आधारभूत धरून त्यांचे दर ठरवावे लागणार आहेत, असे आरटीओ अधिकार्यांनी सांगितले.
काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे दर
सध्या काळ्या पिवळ्या टॅक्सीचे दर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३१ रुपये आणि तेथून पुढील प्रत्येकी एक किलोमीटरसाठी २१ रुपये असा आहे. नियमानुसार एसी कॅबसाठी यामध्ये २५ टक्के वाढ करण्यास परवानगी आहे. मात्र, याबाबतचा निर्णय आरटीएकडून अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे आता पुणे आरटीओ आता लवकरच २५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव आरटीएसमोर मांडणार आहे. त्यानंतरच भाडेवाढीचा निर्णय होणार आहे. तो पर्यंत कोणत्याही टॅक्सीचालकाला भाडेवाढ करता येणार नाही. भाडेवाढ केल्याचे आढळल्यास आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.