पुणे -पुणे महापालिकेच्या हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना अखेर बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेमुळे महापालिकेमध्ये ही गावे समाविष्ट करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरणार आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/339716937606748
महापालिकेच्या हद्दीमध्ये 23 गावे समाविष्ट करण्यासंदर्भात दि.23 डिसेंबर 2020 रोजी नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर तीस दिवसांत नागरिकांना हरकती दाखल करण्याचे आवाहन केले होते. दाखल हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली होती.
राज्य सरकारच्या या निर्णयावर सुमारे 850 हरकती दाखल झाल्या होत्या. करोनामुळे विभागीय आयुक्तांनी हरकतींवर सुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. ही गावे समाविष्ट करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला होता.
तसेच पुणे महानगरपालिकेनेसुद्धा या गावांच्या समाविष्ट करण्यासंदर्भात “ना हरकत’ असल्याचे पत्र राज्य शासनाला पाठविले होते. परिणामी कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने केवळ राज्य सरकारकडून याबाबतचे अंतिम आदेश काढणे बाकी होते. त्यानुसार बुधवारी नगर विकास विभागाने 23 गावे पूर्णत: महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
पुणे महापालिकेमध्ये नव्याने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात मागील तीन वर्षांपासून चर्चा सुरू होती. 2017 मध्ये महापालिकेमध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती.
त्यानंतर उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली जाणार असल्याचे त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तीन वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 23 गावे समाविष्ट करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आणि 23 गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयावर या अधिसूचनेमुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
ही गावे झाली समाविष्ट
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.