पुणे – महापालिकेकडून 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 12 लाख मिळकतींना पोस्टाच्या माध्यमातून मिळकतकराची बिले दिली जाणार आहेत. या बिलांमध्ये 23 गावांमधील मिळकतींचाही समावेश आहे. ही सर्व बिले 25 मार्चपासूनच वितरीत करण्यात येणार असून, नागरिकांना ती 1 एप्रिल पासूनच भरता येणार आहेत. ही माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी दिली.
महापालिकेकडून पोस्टाद्वारे मिळकतकर बिलांचे वाटप केले जाते. यंदा नवीन 23 गावे समाविष्ट झाल्याने जवळपास 1 लाख 20 हजार मिळकती वाढलेल्या आहेत. या गावांना पहिल्या वर्षी 20 टक्केच कर आकारणी केली जाणार असली, तरी त्यांना पालिकेच्या दरानुसार यंदापासूनच बिले पाठविण्यात येणार आहेत. यापूर्वी या गावांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिलांचे प्रत्यक्ष वाटप केले जात होते. मात्र, आता ही गावे पालिकेत आल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीनुसार पोस्टांच्या माध्यमातून मिळकतींच्या पत्त्यावर ती पाठविण्यात येणार आहेत. एका बिलासाठी पोस्ट खात्यास 3 रुपये 20 पैसे द्यावे लागतात.
पहिल्या टप्प्यात 9 लाख बिले
दरम्यान, नियमित मिळकतकर भरणाऱ्या तब्बल 9 लाख मिळकतींना 1 एप्रिलपूर्वीच बिले मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. हे करदाते नियमित कर भरत असल्याने आधी त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 3 लाख बिले दिली जाणार असून यात प्रमुख्याने थकबाकीदारांचा समावेश आहे.