पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, या पुस्तक महोत्सवातून ८.५० लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. तब्बल ४.५ लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात पुस्तक विक्रीतून साधारण ११ कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. पुढील वर्षीही हा महोत्सव अशाच पद्धतीने धुमधडाक्यात आयोजित केला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाची नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात रविवारी सांगता झाली. यावेळी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते. समारोपप्रसंगी आकाशात फुगे सोडण्यात आले.
या महोत्सवाला भेट देणाऱ्या आणि पुस्तकांची खरेदी करणाऱ्यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वाधिक होती. या महोत्सवात चार विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या संयोजन सामितीत प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अॅड. मंदार जोशी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राहुल पाखरे, शैलेश जोशी, संजय मयेकर, मिलिंद कुलकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले. या महोत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन चंद्रकांत पाटील यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे यांची महोत्सववाला भेट
समाजकारण, राजकारण, उद्योग, सेवा अशा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल, तर पुढे जाण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही. पुणे पुस्तक महोत्सवात मराठीसह विविध प्रादेशिक भाषांमधील पुस्तके आहेत. ही पुस्तके घेण्यासाठी सर्वाधिक गर्दी ही युवा पिढीची होत आहे, ही सर्वात दिलासा देणारी बाब आहे, अशी प्रतिकि्रया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
“पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर उपक्रम, कार्यशाळा आणि सेमिनार घेण्यात येतील. पुणे हे जगाची पुस्तकांची राजधानी होण्यासाठी महापालिकेसोबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी नॅशनल बुक ट्रस्टचे एक केंद्र हे पुण्यात स्थापन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. पुढील वर्षी यापेक्षाही भव्य पुणे पुस्तक महोत्सव करून, पुणे पुस्तक महोत्सवाला पुण्याची ओळख करुयात.” – राजेश पांडे, संयोजक