पुणे- पीएमपीच्या बाणेर येथील ई-बस डेपोचे रविवारी उद्घाटन झाले. तर पीएमपीच्या ई-बसेसच्या ताफ्यात 100 बसेसची भर पडली आहे. शहरातील केवळ ई-बससाठीचा हा पहिलाच डेपो असून, यामुळे ई-बसचे संचलन अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे डेपोचे उद्घाटन झाले.
पीएमपीकडून 13 डेपोंतून सुमारे 1500 बसेसचे संचलन होते. त्यापैकी 150 ई-बस आहेत. यामध्ये आता आणखी 100 बसेसची भर पडली आहे. तर पीएमपीकडून ई-बससाठी सहा डेपो चार्जिंग स्टेशन आणि डेपो विकसित करणे नियोजित होते. त्यापैकी बाणेर येथील डेपोचे कामकाज पूर्ण झाले असून, रविवारपासून डेपोतून संचलन सुरू झाले आहे. सुमारे अडीच एकरमध्ये असणाऱ्या या डेपोतून 70 बसेसचे संचलन होणार आहे. तर याठिकाणी 35 एसी/डीसी चार्जर बसवलेले आहेत.
आतापर्यंत पुण्यात ऑलेक्ट्रा बसेसनी 2 कोटी किलोमीटरहून अधिकचा प्रवास केला आहे. बसमधील लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी ट्रॅफिक आणि प्रवासी भारमान यानुसार एका चार्जवर सुमारे 200 किमी प्रवासाची सुविधा देण्यास सक्षम आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या या बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली आहे. यामुळ ब्रेकिंगमध्ये गमावलेल्या गतिज ऊर्जेचा काही भाग पुनर्प्राप्त करण्यास मदत करते. – के. व्ही. प्रदीप, अध्यक्ष, ऑलेक्ट्रा
अधिकाऱ्यांनी केला बसप्रवास
बाणेर येथे पीएमपी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवून बससेवेला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांनी बसप्रवास केला. यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, पीएमपीचे अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, ओलेक्ट्रा कंपनीचे संदीप रायधन आदी उपस्थित होते.