सोलापूर – सोलापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. युवराज कृष्णा भालेराव (वय 56) असे मयत उपनिरीक्षकाचे नाव आहे. भालेराव हे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सुट्टीनिमित्त मामाच्या गावी मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे गेले असता तेथेच त्यांचे निधन झाले.
मोहोळ येथे दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त मामाच्या गावी गेले होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमीनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तपासणीनंतर डाॅक्टरांनी मयत घोषित केले. भालेराव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन विवाहित मुले असा परिवार आहे. भालेराव यांची नुकतीच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या निधनाने सोलापूर सह राज्य पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.