Chris Gayle – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा आयपीएलमधील एक अपयशी संघ राहिलेला आहे. कारण अनेकवेळा शेवटच्या फेरीत पोहोचूनही या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. दुसरीकडे मुंबई आणि चेन्नई सारखे संघ या स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवण्यात यशस्वी राहिलेले आहेत. त्यामुळे आरसीबी संघाने पुढील हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकावे, अशी इच्छा त्यांच्याच संघाचा माजी खेळाडू आणि धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने व्यक्त केली आहे.
IPL 2023 Auction | रिक्षा चालकाचा मुलगा बनला करोडपती; दिल्ली कॅपिटल्सने दिली मोठी रक्कम
आयपीएलमध्ये खेळताना ख्रिस गेलने जास्त काळ आरसीबीकडून क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान त्याने मोठमोठे विक्रमही रचले आहेत. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात ही कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून केली होती. मात्र त्याला खरी ओळख ही आरसीबी संघात आल्यापासून मिळाली. २०११ च्या आयपीएल लिलावात गेलला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्याच हंगामात आरसीबी संघाने डर्क नॅन्स या खेळाडूच्या जागी गेलला संघात सामील केले. येथूनच त्याच्या आयपीएल कामगिरीत मोठी सुधारणा झाली.
गेलने आरसीबी संघासाठी बरीच वर्ष क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केली आहेत. २०१३ या हंगामात त्याने पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध खेळताना १७५ धावांची विक्रमी खेळी खेळली होती. त्याने केलेली ही कामगिरी करणे भविष्यातदेखील कोणत्याही खेळाडूकडून शक्य होणार नाही. आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या फलंदाजीचा नेहमीच दबदबा राहिला. तो खेळताना पळून धावा काढण्यापेक्षा षटकार आणि चौकार मारण्यावर जास्त विश्वास ठेवतो.
आयपीएल २०१८ या हंगामानंतर ख्रिस गेल आरसीबी संघातून पंजाबकडे गेला. यानंतर त्याने काही काळासाठीच क्रिकेट खेळले. गेल आजही आरसीबीलाच आपला संघ मानतो. आयपीएल लिलावादरम्यान गेल म्हणाला की,”मी आरसीबी संघात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससोबतच नाही तर इतर अनेक खेळाडूंसोबतही खूप वेळ घालवला आहे. मी सरफराज खान, मनदीप सिंग आणि केएल राहुल यांनाही भेटलोय, हे खेळाडूही खूपच चांगले होते. साहजिकच कोहली आणि एबीडीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे खूप छान होते. त्यामुळे आम्ही एकमेकांकडून बऱ्याच शिकायचो.”