कोरेगाव – विधानसभा मतदारसंघातील शिरढोणसह एकसळ परिसराचा आता सर्वांगिण विकास होत असून दोन्ही गावे आता प्रमुख रस्त्याने जोडली जाणार आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ४ कोटी २५ लाख रुपये शिरढोण-एकसळ रस्त्यासाठी मंजूर झाले असून, मंगळवारी प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.
लोकनियुक्त सरपंच संदीप साळुंखे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी राजेंद्र साळुंखे, भरत पवार, शेखर कदम, संजय धनवे, उदय कदम, ग्रामपंचायत सदस्य महेश तोडरमल, हनुमंत साळुंखे, प्रमोद माने यांच्या उपस्थितीत शिरढोण बाजूने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या रस्त्यामुळे शिरढोणहून गोगावलेवाडी मार्गे थेट एकसळ येथे जाता येणार आहे. अवघ्या पाच मिनिटात हा प्रवास होणार असून, कोरेगाव शहरातून जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ग्रामीण भागातील शिरंबे, एकसळ, न्हाळेवाडी, निगडी परिसरातील नागरिकांना शिरढोणमार्गे थेट सातार्याकडे जाता येणार आहे. कोरेगाव शहरातून न जाता, या नवीन मार्गाने गेल्यावर वेळ आणि पैसा वाचणार आहे.