थेऊर -केशरी (एपीएल) रेशनकार्डधारकांचे ऑनलाइनवर नाव नसेल तरीही त्याला विहित केलेल्या दराने व प्रमाणातच एक मेपासून अन्नधान्य देण्याचे फर्मान हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी काढले आहे. रेशनकार्ड आहे; मात्र ऑनलाइन लिंकिंग नसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवेली तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानांची तपासणी करून नागरिकांना सुलभतेने अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी अव्वल कारकून, मंडलाधिकारी व तलाठी यांच्या पथकांची नेमणूक केली आहे. जे शिधापत्रिकाधारक एपीएल केशरी कार्डधारक आहेत ज्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने लाभ मिळत नाही, अशा एपीएल लाभार्थ्यांसाठी शासनाने मे व जून 2020 या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने प्रत्येक लाभार्थ्याला 8 रुपये प्रतिकिलो प्रमाणे 3 किलो गहू व 12 रुपये प्रतिकिलो प्रमाणे 2 किलो तांदूळ वाटप करावा, असे स्पष्ट आदेश तहसीलदारांनी बजावले आहेत.
अन्नधान्य वाटप करतांना रजिस्टरवर नोंदी ठेवण्यात याव्या त्यात शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील सर्व तपशिल याची नोंद घेऊन त्यावर धान्य घेण्यास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताचा अंगठा घेऊन रजिस्टर सुस्थितीत ठेवायचे आहे.