पेरणे विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरवाव्यात

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचना

कोरेगाव भीमा-हवेली तालुक्‍यातील पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्सेने नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्‍यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पेरणे (कोरेगाव भीमा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच विजयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. टॅंकरद्वारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, फिरते स्वच्छतागृह, ये-जा करण्याकरिता एस. टी. महामंडळ व पीएमपीएमएलने पुरेशा बसेस उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य विभागाने रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा तयार ठेवावा.

बांधकाम विभागाने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था करावी. विद्युत विभागाने पुरेसा विद्युतपुरवठा करावा. अन्न व औषध विभागाने खाद्य पदार्थांच्या दुकानामध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. अग्नीशमनवाहिका तसेच आवश्‍यक त्या सुविधा वेळेत पुरवण्यासाठी सर्वांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. या बैठकीस महसूल, गृह विभागाबरोबरच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, वढू, पेरणे येथील सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते.

  • विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून कामे करावीत. या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.
    -संदीप पाटील, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

Leave A Reply

Your email address will not be published.