सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोजक्‍याच घराण्यांचा प्रभाव

पक्षांतर झाले तरी रिंगणात तेच नेते


 या विधानसभेला तेच चित्र कायम

स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर काही मोजक्‍याच घरांनी राज्य केले आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व असण्याचा काळ असू दे किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा, हीच घरे प्रभावी होती आणि आता पक्ष बदलले, झेंडे बदलले तरीही या विधानसभा निवडणुकीतही त्याच मोजक्‍या घरांतील उमेदवार रिंगणात दिसणार आहेत आणि निवडणुकीच्या राजकारणात तेच प्रभावी ठरणार आहेत.

पहिल्या विधानसभा निवडणुकीपासूनच जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. सुरुवातीच्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे चांगले अस्तित्व होते. नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे जिल्ह्यात दीर्घकाळ फक्‍त कॉंग्रेसचाच वरचष्मा राहिला. 1977 च्या विधानसभेत जनता पक्षातर्फे अभयसिंहराजे भोसले हे पहिले कॉंग्रेसेतर उमेदवार विजयी झाले.

मात्र, तेही नंतर कॉंग्रेसमध्ये गेले. त्यामुळे भाजप किंवा शिवसेनेला जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात नगण्यस्थान होते. 1995 च्या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेने जावळी मतदारसंघातून विजय नोंदविला. कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदीमुळे तिथे शिवसेनेचे सदाशिव सपकाळ निवडून आले होते. त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर सातारा मतदारसंघातून खासदार झाले. सातारा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 1998 मध्ये भाजपतर्फे उदयनराजे भोसले विजयी झाले. भाजपचा हा पहिला विजय ठरला. नंतर खटावमधून डॉ. दिलीप येळगावकर भाजपचे आमदार झाले. नंतर मात्र, कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात वर्चस्व मिळवले. उदयनराजे भोसले कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर डॉ. येळगावकरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्याने भाजपचे स्थान पुन्हा नगण्य झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे सरकार आल्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोखरून काढत भाजपमध्ये मेगाभरती सुरू केली. मात्र, या भरतीतही भाजपच्या गळाला याच घरातील नेतेमंडळी लागली. त्यामुळे पक्ष बदलले तरीही नेते तेच, अशी अवस्था झाली. राजकारणात नव्याने काही लोक आले ते अपवादात्मकच. आले तरी प्रभावशाली घरांतील नेत्यांसमोर त्यांची डाळ शिजणे तसे अवघडच.

या घरांनी सातत्याने लोकसंपर्क बळकट करत आपापल्या विभागात वाढते वर्चस्व ठेवले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. साहजिकच राजकारणाच्या प्रवाहात या घरांनी पक्के स्थान निर्माण केले.

वाई तालुक्‍यात प्रतापराव भोसले व लक्ष्मणराव पाटील, साताऱ्यात राजघराणे, पाटणमध्ये देसाई आणि पाटणकर, कराडमध्ये पी. डी. पाटील, आनंदराव व प्रेमलाकाकी चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले यांच्याच घरातील कोणी ना कोणी रिंगणात असते. फलटणचे नाईक निंबाळकर घराणे प्रभावशाली आहे. या घरातील दुसऱ्या पिढ्यांतील प्रतिनिधी आता राजकीय कसब पणाला लावत आहेत.

माणमध्ये गोरेंचे घर फार्मात…
पूर्वीच्या खटाव मतदारसंघात काही काळ केशवराव पाटील व चंद्रहार पाटील यांच्यात मोठा संघर्ष असायचा. नंतर भाऊसाहेब गुदगे गट प्रभावी झाला. त्यांचे चिरंजीव सुरेंद्र गुदगे राजकारणात आहेत. माण मतदारसंघात सदाशिवराव पोळ यांनी किंगमेकर म्हणून अनेक वर्षे राजकारण केले. आता त्यांच्या दोन सुना जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. डॉ. सदीप व मनोज पोळ राजकारणात सक्रिय आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माणमधील राजकारण गोरे यांच्या घराने ताब्यात घेतले. गेल्या वेळी गोरे बंधूंमध्येच लढत झाली. यावेळीही आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यातच प्रमुख लढत होण्याची शक्‍यता आहे. माणमध्ये गोरे यांचे घर प्रभावी ठरले असून इतर पक्ष, गट, तट नेते त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.