नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत नववर्षाच्या पहिल्या दिवशीही वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला (का) विरोध दर्शवण्यासाठी निदर्शनांचे सत्र सुरूच राहिले. नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर झालेली गर्दी आणि निदर्शकांमुळे दिल्लीत काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
इंडिया गेट परिसरात काविरोधी निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घेतली. काबरोबरच निदर्शकांनी प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकाच्या (एनपीआर) मुद्द्यांवरूनही आक्रमक पवित्रा स्वीकारला.
कुठलीही कागदपत्रे दाखवणार नाही, अशा आशयाच्या घोषणा निदर्शकांनी दिल्या. दिल्लीच्या इतर भागांतही निदर्शने झाली. त्यामध्ये विद्यार्थी आणि विविध नागरी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. निदर्शकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काही कलाकारांनी गाणी गायली.