स्मार्ट सिटी डेकोरेशनच्या नावाखाली शहरात बसवले होते डेकोरेटिव्ह खांब
प्रशासनाने एकाच ठिकाणी बसवले दोन खांब
पुणे – स्मार्ट सिटीतील स्मार्ट डेकोरेशनसाठी बसवण्यात आलेले निलायमच्या पुलावरील डिझायनर पथदिवे गायब झाले आहेत; तर बहुतांश बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी 34 डिझायनर पथदिवे बसवले आहेत, त्यातील 14 बंद अवस्थेत आहेत तर, चार पथदिव्यांचे दिवेच गायब करण्यात आले आहेत.
स्मार्ट सिटीच्या डेकोरेशनच्या नावाखाली शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर डेकोरेटिव्ह खांब बसवले आहेत. फुटपाथ मोठे केले असून, त्यावर हे खांब बसवले आहेत. शहर सुशोभिकरणामध्ये पादचारी मार्गाची रुंदी वाढविली जात आहे. हे पादचारी मार्ग अधिक आकर्षक करण्यासाठी याठिकाणी वेगवेगळे उपक्रम केले जात आहेत. नागरिकांना बसण्याची व्यवस्था, सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग अशा गोष्टींचा यात समावेश आहे.
हे रस्ते बांधताना या पादचारी मार्गालगत डिझायनर पोल बसवून सार्वजनिक दिवे बसविले जात आहे. वास्तविक या पोलची डिझाइनचे अनेक प्रकार आहे. यामुळे त्यात एकसारखेपणा नाही. नियमित पोलच्या किंमतीचा विचार करता या पोलसाठी तिप्पट रक्कम जास्त मोजावी लागत आहे.
विशेष म्हणजे या खांबांच्या शेजारीच रस्त्यांवर साधे खांबही आहेत. वीजखर्च वाचविण्यासाठी महापालिकेने सर्व सार्वजनिक दिवे “एलएडी’ बसविले होते. हा प्रकल्पदेखील वादग्रस्त ठरला होता. त्यानंतरही आता डिझायनर पोल बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच ठिकाणी दोन खांब बसवण्याचा प्रतापही प्रशासनाने केला आहे. यामुळे अक्षरश: विजेची दिवाळीच महापालिकेने सुरू केली आहे. या डेकोरेशनसाठी पुरवण्यात येणाऱ्या विजेवर साध्या पोलपेक्षा चौपट खर्च करावा लागत आहे. अशातच हे दिवे आता गायब होण्याला सुरुवात झाली आहे.
एका डेकोरेटिव्ह खांबाची किंमत 30 ते 40 हजार
या दिव्यांची उंची अन्य दिव्यांपेक्षा कमी आहे. ते लोखंडी असल्याने काढून नेले जात असल्याचे दिसून आले आहे. या डेकोरेटिव्ह असलेल्या एका खांबाची किंमत 30 ते 40 हजार आहे तर, साध्या खांबाची किंमत 8 हजार रुपये आहे. हा दर सुमारे पाचपट जास्त आहे. असे असताना या खांबांची कोणत्याही प्रकारे काळजी घेतली जात नाही. एवढेच नव्हे तर या खांबांवरील लाईटसच्या काचाही फुटल्या आहेत. जवळपास सर्वच ठिकाणची ही परिस्थिती आहे. त्यामुळे डेकोरेशनच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा खर्च महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, त्याची देखभाल केली जात नसल्याचेच यातून समोर आले आहेत.