सातारा – बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटत असून शुक्रवारी सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महिला आघाडीच्यावतीने पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निषेध नोंदवला. घोषणाबाजी करत बंडातात्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
राज्य सरकारने वाइन विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यसनमुक्त युवक संघटनेच्यावतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले होते. यावेळी बंडातात्यांनी आंदोलनात सहभागी होत वाइन विक्रीच्या निर्णयावरून राजकीय पक्षांच्या नेत्यांसह महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आज कराडकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पोवई नाका येथे एकत्र येत दोन्ही कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने बंडातात्यांचा निषेध नोंदवण्यात आला. “मुखाने बोलतात रामकृष्णहरी, त्यांनीच केली बदनाम नारी,’ “बंडातात्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
कारवाई न केल्यास त्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी सरचिटणीस संगीता साळुंखे, सीमा जाधव, अनघा कारखानीस, युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे, उषा शिंदे, अनुराधा थोरात, निर्मला जाधव, शुभांगी थोरात, सोनाली साळुंखे, मनीषा साळुंखे, छाया साळुंखे, सुप्रिया पाटील, इंदुमती घाडगे, रेखा घाडगे, लता पवार, तेजल मांडवे, सुनीता पिसाळ, सविता मांडवे, कविता जाधव, लता साळुंखे, संगीता साळुंखे, शोभा पवार, कुसुम जाधव, विमल पवार, मयुरी मांडवे, सुरेखा जाधव, शोभा साळुंखे, स्मिता शिंदे, जयश्री शिंदे, डॉ. सुनीता शिंदे, सुवर्णा पवार, शुभांगी साबळे, मेघा माने, रेश्मा माने, लक्ष्मी आवळे, सोनाली आवळे, लीलाबाई आवळे, लता आवळे, लक्ष्मी आवळे, निर्मला आवळे, छाया माने, कांचन कुंभार आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, रजनीताई पवार, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, आशाताई जाधव आदीसह महिला कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.