हर्षद कटारिया
मार्केट यार्ड – कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवनेरी पथावरील भाजी मार्केट समोरील वाहनतळामधील जागा होलसेल फिश मार्केट आणि पोल्ट्री व्यवसायासाठी देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी (दि. 11) सर्वधर्म समाजातर्फे उत्सव हॉटेल ते कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय तसेच सर्वधर्मीय शेकडो नागरिकांनी मूक मोर्चा काढत निषेध नोंदवला. मात्र, निवेदन घेण्यास बाजार समितीचे सभापती उपस्थित नव्हते. यावर अधिकच संताप व्यक्त करण्यात आला.
होलसेल फिश मार्केट आणि पोल्ट्री व्यवसायासाठी जागा देण्याचा ठराव बाजार समितीने मंजूर केल्याबाबत सर्वप्रथम ‘प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर परिसरातील राजकीय, सामाजिक, सोसायट्यांचे पदाधिकारी, संघटना आणि सर्वधर्मीय नागरिकांनी सदर व्यवसाय सुरू करण्याला कडाडून विरोध केला. आमदार, माजी नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते यांनी तीव्र विरोध करूनही बाजार समिती आपल्या निर्णयावर ठाम होती. आज, या निर्णयाविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार, माजी नगरसेवक, जैन समाजाचे पदाधिकारी, सोसायट्यांचे पदाधिकारी, संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन स्वीकारण्यासाठी सभापती अनुपस्थित…
ठराव रद्द करण्यासाठी आठ दिवसांची मुदत बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांनी मागितली होती, त्यामुळे आठ दिवसांसाठी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. नवनिर्वाचित संचालक मंडळाने शेती कायद्यातील नियमन असलेल्या मासळी बाजाराचा आधार घेत, या भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचा निर्णय घेत, तसा ठराव मंजूर केला. मात्र, मोठ्या संख्येने नागरिक मोर्चा घेऊन आल्यावर सुद्धा सभापती उपस्थित नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
फिश मार्केटसाठी जागा देण्याचा ठराव सर्व अठरा पदाधिकाऱ्यांच्या मताने झाला होता. आता तीन पदाधिकाऱ्यांनी ठरावाला विरोध केला आहे. समितीच्या पुढील बैठकीमध्ये या ठरावाबाबत काही निर्णय घेण्याचा असेल तर तो बहुमतानुसारच होईल. फिश मार्केटला परवानगी देणे, शेती नियमानुसार कायदेशीर आहे. – दिलीप काळभोर,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीने फिश मार्केट सुरू करण्यासाठी मंजूर केलेला ठराव पुढील आठ दिवसांत रद्द करण्यासाठी मी, संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले तिन्ही संचालक प्रयत्न करू अन्यथा आम्ही तिन्ही संचालक राजीनामे देऊन ठरावा विरोधात नागरिकांसोबत आंदोलनमध्ये सहभागी होऊ. – गणेश घुले, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक घेत असलेल्या नवनवीन निर्णयामुळे व्यापाऱ्यांना समस्या निर्माण होऊन त्रासच होत आहे. पुढील आठ दिवसांत फिश मार्केटचा ठराव रद्द केला नाही तर मी आमरण उपोषण करणार आहे. – प्रविण चोरबेले, माजी अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर
बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांनी आठ दिवसांत फिश मार्केट करण्याचा ठराव रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन तूर्त स्थगित करीत आहोत. मात्र, आठ दिवसांत ठराव रद्द केला नाही तर नवव्या दिवशी नागरिकांसोबत कॉंग्रेसही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे, याची समितीने नोंद घ्यावी. – अरविंद शिंदे, अध्यक्ष कॉंग्रेस पक्ष पुणे शहर
बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांनी आठ दिवसांत फिश मार्केट करण्याचा ठराव रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन तूर्त स्थगित करीत आहोत. मात्र, आठ दिवसांत ठराव रद्द केला नाही तर नवव्या दिवशी नागरिकांसोबत कॉंग्रेसही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे, याची समितीने नोंद घ्यावी. – अरविंद शिंदे, अध्यक्ष कॉंग्रेस पक्ष पुणे शहर