लांडेवाडी येथे पत्रकारांशी संवाद
मंचर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी सरकार काम करत असून आमचे सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना घाई गडबड करून चालणार नाही. समाजाला आरक्षण दिल्यास ते कायद्याच्या चौकटीत व न्यायालयात टिकणारे असावे. गडबडीत आरक्षण देऊन ते न्यायालयात न टिकल्यास मराठा समाजाची फसवणूक केल्यासारखे होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सोमवारी (दि. 11) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शनासाठी आले होते, यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवणे महत्त्वाचे असून सर्व अभ्यास करून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटी टिकणारे आरक्षण कसे देता येईल यासाठी सरकार काम करत असून त्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावली असून, या बैठकीत सर्व पक्षांतील नेत्यांच्या सूचना लक्षात घेऊन त्याच्यावर विचारविनिमय केला जाईल. सध्या राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून हा राजकीय विषय नसून सामाजिक विषय आहे. त्यामुळे विरोधकांनी या विषयाचे राजकारण न करता राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. यासाठी सहकार्य करावे असेही शिंदे यांनी सांगितले.