नगर – देशभरात मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर तसेच महिलांवर होत असलेले सामूहिक अत्याचार, बलात्कार, हत्या, मॉबलिंचींग व इतर घटनांचे वाढत्या प्रमाणाचा विरोध व निषेध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी सत्ताधारी भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भोसले, राज दिवेकर, संजय सावंत, नामदेव राळेभात, संजय संसारे, इमरान जहागीरदार, संजय कांबळे, मनोहर वाघ, राधेलाल नकवाल, जालिंदर निकम, गणेश चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते.
या आंदोलनास बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा, बुध्दिष्ट इंटर नेटवर्क, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, वाल्मिक संघटना, आदिवासी एकता परिषद, लहुजी क्रांती मोर्चा, भारतीय बौध्द महासभा आदी इतर संघटनांनी पाठिंबा दिला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र, पोलीसांनी परवानगी नाकारुन हस्तक्षेप केल्याने जुने बस स्थानक येथेच निदर्शन करुन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. तर पाच व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी उच्चवर्णीय समाजातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.