नवी दिल्ली – मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्याकडून गुन्हेगारांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप तेथील प्रमुख विरोधी पक्षाने केला आहे. मालदीवमधील प्रोसिक्युटर जनरल हुसैन शमीम यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर विरोधकांनी हा आरोप केला आहे.
प्रोसिक्युटर जनरल हुसैन शमीम यांच्यावर माले शहराच्या रस्त्यावरच हल्ला करण्यात आला आहे. मोटरसायकलवरून आलेल्या दोघाजणांनी शमीम यांच्यावर वार केले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र त्यांच्यावर कोणत्या हत्याराने वार झाले, हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. या हल्ल्यानंतर शमीम यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या हल्ल्यावर टीका करताना हल्ला करणारे आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकार् यांचे निकटचे संबंध असल्यामुळेच हिंसाचाराच्या उघड घटना घडत असल्याचा आरोप मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीने केला आहे.मुइझ्झू यांचे सरकार उच्च पदस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले आहे. घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या जात नाहीत. पूर्वीच्या सरकारच्या काळात हिंसक घटनांना आळा घातला गेला होता. मात्र मुइझ्झू यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.
माजी अध्यक्ष सोलिह यांनीही सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये प्रोसिक्युटर जनरलवरील हल्ला हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली आहे. सरकारने गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले संबंध तोडून टाकावेत, अशी मागणीही एमडीपीने केली आहे.