एक असेही प्रॉमिस

आज जेव्हा डोळे उघडले, तेव्हा सर्वात आधी जाणवला तो स्पर्श तुझ्या हातांचा होता. माझ्या हातांमध्ये हात धरून, अगदी माझ्या बेड शेजारच्या छोट्याश्‍या खुर्चीवर तु तुझे शरीर चोरून झोपला होता, खूप गाढ. कदाचितं त्यामुळेचं तुझ्या त्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून मला तुला उठवायचे धाडसचं झाले नाही बहुतेक.

खरेतरं मी जन्म घेतला तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद मी पाहू शकले नव्हते, परंतु आज त्या पेक्षाही कित्येक पटीने जास्त आनंद तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. अगदी जेव्हा नर्स चेकिंगसाठी आल्यावर मला शुद्धीवर पाहून तिने डॉक्‍टरांना आवाज दिला, त्या क्षणी तिने तुझी झोपमोड केली म्हणून राग आला होता मला खूप, परंतू तिच्या आवाजाने झोपेतून जागे झाल्यावर जेव्हा तु मला पाहिले तेव्हा अगदी अलगदं वाहणारे, आणि तु कितीही लपवायचा प्रयत्न केलेले ते अश्रू मात्र माझ्या नजरेने हेरले होते. जेव्हा तु मिठाई आणायला गेला होता, तेव्हा तु सांगितल्याप्रमाणे ती नर्स अगदी माझी बारकाईने काळजी घेतं होती, ती मला फळे खाऊ घालताना मी तिच्याशी गप्पा मारताना मला त्या नर्सने सांगितले की, माझा एक्‍सिडेंट झाल्यावर, मला ईथे या हॉस्पिटल मध्ये आणले आणि जेव्हा मी कोमात गेली, असे डॉक्‍टरांनी सांगितले तेव्हा तु खूप रडला होता, आणि त्यानंतर गेली दीड वर्षे तु रोज माझ्याजवळ येऊन बसतो. दिवसा ऑफिस आणि नंतर मी। तु रोज जाताना त्या नर्सला माझ्याकडे बारकाईने लक्ष द्यायला सांगायचा. डॉक्‍टरांना रोज विचारायचा. रोज माझ्याशी बोलायचा तु, कदाचितं मी कधीतरी तुझ्याशी बोलेल, या वेड्या आशेने.

खरे सांगू, मला खरेतरं माझाचं राग येतं होता त्या क्षणी. मी तुझे प्रेम डावलून, ज्याला खरे प्रेम समजून, ज्याच्यासाठी तुझ्याशी रागाने भांडण करून तुला सोडून चालले होते, तो मात्र आज कुठेचं दिसत नव्हता.

मला फारसं आठवतं नाही रे, पण तुझ्याशी भांडण करून मी त्याच्याकडे गेले आणि त्याला तेव्हा सगळे सांगितले. माझी खोटी, हो आता त्याला खोटीचं समजूत म्हणता येईल, माझी समजूत घालून तो मला कॉफी शॉंप मध्ये घेऊन गेला. तिथून बाहेर पडल्यावर आम्ही गाडी पार्किंग कडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने मला धडक दिली, नंतर काय झाले माहिती नाही, मी कशी आणि कधी हॉस्पिटलमध्ये पोहचले, तुला कसे कळले हे माहिती नाही, परंतु नर्सने सांगितले त्याप्रमाणे गेली दीड वर्षे माझ्याजवळ फक्त तुचं होता.

खरेतरं बाबा, तु मला लहानपणापासूनचं काही बोलला नाहीसं. माझे सगळे हट्ट पुरवलेसं. मुळात तु नेहमी माझा मित्र होऊन माझ्याशी वागलास, त्यामुळेचं कदाचितं मी तुझ्याशी सगळे काही बिनधास्त पणे बोलायचे. त्यानंतर बालपणी मित्रमैत्रिणींनी, कॉलेजमध्ये आल्यावर प्रियकराने ही, खूप प्रॉमिसेस दिली, पण माझा जन्म झाल्यावर तु अगदी मला फुलाप्रमाणे जपण्याचे आणि माझ्या प्रत्येक सुखामधे आणि दुःखामध्ये माझा हात धरून उभे रहायचे दिलेले प्रॉमिस मात्र कधीचं मोडले नव्हते, अगदी आज ही मी डोळे उघडले तेव्हा माझा हांत हातांमध्ये धरून तु माझ्या शेजारी होता, माझ्या सोबत होता..!!

मुलींसाठी खरेतरं तिचा “बाबा’, हाचं लहानपणापासून तिचे पहिले प्रेम असतो. तिच्यासाठी तिचा “बाबा’, म्हणजे “हिरो’, असतो. बाबांसारखे ती ही, “मी तुला कधी च नाही सोडून जाणार’, असे प्रॉमिस ही देते, परंतु नंतर आयुष्याचा जोडीदार भेटल्यावर ती ते प्रॉमिस विसरते, परंतु “बाबा”, मात्र अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत ते प्रॉमिस जपतं नाही, तर जगतं असतो..!!

बाबा, आज खरेतरं तुझा चेहऱ्यावरचा तो आनंद मला पुन्हा तुझ्या प्रेमाची जाणीव करून देऊन गेला. मला माहितं नाही, आयुष्याची ही दीड वर्ष आणि त्या जखमा आता कशा भरून निघतील, परंतु कितीही काही झाले तरी इथून पुढे माझ्या चेहऱ्यावरची ती खळी आजपासून मात्र नक्की खुललेली असेल, कारण “मी तिच्या डोळ्यात कधीचं अश्रू, नाही येऊ देणार’, असे स्वतःशी प्रॉमिस केलेला “माझा बाबा’, माझ्या सोबत आहे..!!

– ऋतुजा कुलकर्णी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.