मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला नफा 29 टक्क्यांनी वाढून 3,656 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेला 2,832 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बर्याच खासगी बँकांचा नफा कमी झाला असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची परिस्थिती मात्र तुलनेने सुधारली असल्याचे दिसून येते.
या बँकेचे व्याजातील उत्पन्न 9.5 टक्क्यांनी वाढून 9,417 कोटी झाले आहे. त्याचबरोबर बँकेची ढोबळ आणि निव्वळ अनुत्पादक मालमत्ता अनुक्रमे 4.39% आणि 1.32% इतकी मोजली गेली आहे.
इंडियन ओव्हरसिज बँक
इंडियन ओव्हरसिज बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला नफा 30 टक्क्यांनी वाढून 723 कोटी रुपये झाला. गेल्यावर्षी या तिमाहित बँकेला 555 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 6,176 कोटी रुपये झाले आहे. बँकेचे ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 3.90% तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.62% इतकी झाली आहे. बँकेची भांडवल पर्याप्तता 16.80% पर्यंत वाढले आहे.
इंडियन बँक
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेनेही बुधवारी आपला ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदातील माहितीनुसार या बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला नफा तब्बल 52% वाढून 2,119 कोटी रुपये झाला आहे. गेल्यावर्षी या तिमाहीत चेन्नई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेचा नफा 1,396 कोटी रुपये इतका होता. बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 14,198 कोटी रुपये इतके झाले आहे. या बँकेला खराब कर्जापोटी केवळ 906 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्यावर्षी ही रक्कम 1,474 कोटी रुपये इतकी होती. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण कमी होऊन 15.58 टक्के इतके झाले आहे.
युको बँक
इको बँकेला तिसर्या तिमाहित झालेला नफा 23 टक्क्यानी वाढून 503 कोटी रुपये झाला आहे. कलकत्ता येथे मुख्यालय असलेल्या या बँकेला गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत 553 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. या तिमाहीत बँकेचे व्याजातील उत्पन्न वाढून 5,552 कोटी रुपये इतके झाले. आगामी काळात बँकेची कर्ज वितरण करण्याची क्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. खासगी बँकांनी बर्याच प्रमाणात नकारात्मक ताळेबंद जाहीर केले असताना सरकारी बँकांनी मात्र या कालावधीत चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.