पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त फुले- शाहू- आंबेडकर चळवळीचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांना (मरणोत्तर) राष्ट्रपितामह ज्योतिबाराव फुले पुरस्कार, तर माइंड पॉवर ट्रेनर आणि राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ. दत्ता कोहिनकर यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले.
समता भूमी, महात्मा फुले वाडा, गंज पेठ येथे गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते.
पुरस्काराचे यंदाचे पहिले वर्ष आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, युवराज बनसोड, अविनाश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख किरण मोरे, रतनलाल सोनग्रा आदी उपस्थित होते.
प्रा. हरी नरके यांना (मरणोत्तर) जाहीर करण्यात आलेला पुरस्कार सीताराम नरके यांनी स्वीकारला. सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. अॅड. आडकर, बागवे, कोहिनकर यांचीही भाषणे झाली.