मुंबई : आक्रमक आणि भक्कम चढाईपटूंची भागीदारी कोणत्याही क्षणी कबड्डीचा सामना फिरवू शकतात. प्रो कबड्डी लीगमध्येही असे अनेक चढाईपटू आहेत जे त्यांच्या एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला एकहाती सामना जिंकूण देऊ शकतात. त्यामुळे, प्रत्येक संघ लिलावात उच्च-गुणवत्तेच्या चढाई पटूंना आपल्या संघात समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या लेखात आपण प्रो कबड्डी लीगच्या 8 हंगामातील पाच सर्वोत्तम चढाईपटूंच्या जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत.
1. परदीप नरवाल आणि श्रीकांत जाधव (यूपी योद्धा)
विक्रमवीर परदीप नरवालने त्याच्या चढाई कौशल्यामुळे कबड्डी जगताला अक्षरश: वेडे केले आहे. 1,100 पेक्षा जास्त चढाई गुण मिळवत त्याने पटना पायरेट्सला सलग तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. असे असले तरी यंदा तब्बल 1.65 कोटी मोजत यूपी योद्धाने परदीपला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. त्यामुळे अनुभवी परदीप नवख्या यूपी योद्धासाठी हुकमाचा एक्का ठरणार आहे.
श्रीकांत जाधव हा यूपी योद्धाचा गेल्या मोसमात 148 गुणांसह सर्वात यशस्वी चढाईपटू होता आणि म्हणूनच, संघाने त्याला 8 व्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. यावेळी श्रीकांतला परदीप नरवालची साथ लाभणार असल्याने यूपी योद्धाला प्रो कबड्डी लीगचे पहिले विजेतेपद खुणावत आहे.
2. पवण सेहरावत आणि चंद्रन रणजीत (बेंगळुरू बुल्स)
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात बंगळुरु बुल्सचा आपले पहिले विजेतेपद मिळवून देण्यात पवण सेहरावतचा सिंहाचा वाटा होता. आणि सातव्य हंगामातही पवणने त्याची दमदार कामगिरी कायम ठेवत चढाई करताना 346 गुण मिळवले होते.
यंदा बंगळुरु बुल्सने तामिळनाडूच्या चंद्रन रणजीतला आपल्या संघात समाविष्ट केल्याने पवण सेहरावतला एक आक्रमक साथीदार लाभला आहे. चंद्रन रणजीतने गेल्या दोन मोसमात 271 चढाई गुण आणि पाच वेळा सुपर 10 गुण मिळवले आहेत. त्यामुळे यंदा पवण-रजणीत या चढाईपटूंची जोडी कशी कामगिरी करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
3. नितीन तोमर आणि राहुल चौधरी (पुणेरी पलटण)
यंदा पुणेरी पलटणसाठी नितीन तोमरसह राहुल चौधरीही चढाईपटू म्हणून खेळताना दिसेल. स्पर्धेच्या सहाव्या हंगामापासून पलटणच्या चढाईची धुरा एकहाती वाहणार्या नितीनला, यंदा राहुलच्या समावेशामुळे चांगलेच बळ मिळाले आहे.
प्रो कबड्डी लीगच्या कारकिर्दीत आपल्या खात्यात 1000 पेक्षा जास्त गुण असणार्या राहुल चौधरीमुळे पुणेरी पलटणला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची चांगली संधी असणार आहे.देशांतर्गत स्पर्धेत दोन्ही खेळाडू अनेक वर्षे एकत्र खेळत असल्याने या चढाईपटूंचा अनुभव विरोधी संघासाठी घातक ठरु शकतो.
4. सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार (तेलुगु टायटन्स)
तेलुगू टायटन्सने 8 हंगामासाठी ङ्कबाहुबलीङ्ख सिद्धार्थ देसाईला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मागील दोन हंगामात जबरदस्त कामगिरी करत 435 चढाई गुण मिळवले आहेत. यंदा तेलुगू टायटन्सने रोहित कुमारचा संघात समावेश केल्यामुळे त्यांच्या चढाईला चांगलीच धार मिळणार आहे. या दोन्ही अनुभवी चढाईपटूंच्या जोरावर तेलुगू टायटन्स कोणत्याही संघाला चितपट करु शकते.
5. नवीन कुमार आणि अजय ठाकूर (दबंग दिल्ली)
दबंग दिल्लीमध्ये अनुक्रमे नवीन कुमार आणि अजय ठाकूरच्या रुपाने तरुणाई आणि अनुभव यांचा उत्कृष्ठ संगम साधला आहे. नवीन कुमारने गेल्या हंगमात 301 गुणांसह ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. तर दुसरीकडी प्रो कबड्डी लीगमध्ये जवळपास 800 गुण मिळवणार्या अजय ठाकूरच्या रुपाने नवीला एक उत्तम साथीदार मिळाला आहे. त्यामुळे या दोघांची जोडी विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो.