सातारा – खोडद, ता. सातारा येथील बेपत्ता विलास महिपती जाधव हे 22 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. त्यांचा खून सावकारकीच्या पैशाचा तगादा लावल्याने करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलीस यांनी केलेल्या संयुक्त तपासात तिघांना अटक करण्यात आली आहे. आकाश तुकाराम जांभळे (रा. जांभगाव, ता. सातारा), संतोष संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर काशीळ), संजय रामचंद्र जाधव (रा. खोडद) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत.
या खुनाच्या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, विलास महिपती जाधव हे आपली पत्नी जयश्री यांना बाहेर जेवायला जातो असे सांगून 22 नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडले ते माघारी परतले नाहीत. त्यामुळे बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये पती मिसिंग झाल्याबाबत तक्रार देण्यात आली होती. विलास जाधव यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर आणि बोरगाव पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या तपासाची सूत्रे गतिमान केली. या समांतर तपासात ज्या लोकांवर संशय व्यक्त करण्यात आला होता त्यांची गोपनीय माहिती गोळा करण्यात आली.
विलास जाधव यांनी बऱ्याच लोकांना व्याजाने पैसे दिल्याची माहिती समोर आली तसेच तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज या माध्यमातून ज्यांना व्याजाने पैसे दिले त्यातील तिघांनी कट करून विलास जाधव यांचा खून केल्याची माहिती समोर आली आरोपींनी संगणमत करून विलास जाधव यांना यवतेश्वर परिसरात जेवायला नेले, त्यांचा तेथे दोरीने गळा आवळून खून केला. यासंदर्भात तपास पथकाने दोघांना निसराळे फाटा येथून ताब्यात घेतले. या दोघांनीही जाधव यांच्याकडून पन्नास हजार रुपये व्याजाने पैसे घेतल्याचे कबूल केले.
विलास जाधव हे सातत्याने त्यांना पैशाचा तागादा लावून शिवीगाळ व दमदाटी करत होते त्याच्या त्रासाला कंटाळून संबंधितांनी जाधव यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी मयत विलास जाधव यांचा मृतदेह यवतेश्वर रस्त्यावरील गणेश खिंड परिसरातील दरीमध्ये टाकून दिला होता. तो मृतदेह ठिकाण दाखवून काढून दिला आहे.
या तपासात त सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गरजे, उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे,आतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, संतोष सपकाळ, संतोष पवार, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, अजित करणे, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल माने, प्रवीण पवार, वैभव सावंत, विशाल पवार, धीरज महाडिक, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, शिवाजी गुरव, गणेश कचरे, पंकज बेसके, यांनी या कारवाईत भाग घेतला सिव्हिल हॉस्पिटलचे फॉरेन्सिक डॉक्टर राहुल खाडे यांनी पार्थिवाच्या उत्तर क्रियेचे वैद्यकीय घटक संकलित करणे कामी मदत केली. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना बेकादेशीर सावकारीचा जर त्रास होत असेल तर त्यांनी अवैध सावकारी संदर्भात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.