पराग शेणोलकर
कराड – विधानपरिषदेच्या निवडीच्या पार्श्वभूूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर (काका) यांची सोमवारी झालेली भेट जिल्ह्यातील कॉंग्रेसला उर्जितावस्था मिळवून देणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या काका- बाबा गटाने एकत्र येणे हीच कॉग्रेसच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड असून काकांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील उंदाळकर यांना विधनपरिषदेच्या सदस्यत्वाची संधी मिळण्याचे संकेत या घडामोडींनी दिल्यामुळे कॉंग्रेसच्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.
काका- बाबा गटाचे अनेक वर्षांचे हाडवैर संपूर्ण राज्याला सर्वश्रृत आहे. मात्र, गेल्या काही वर्षात राजकारणात प्रभावी असलेल्या नेत्यांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष एकमेकांची मदत घ्यावी लागली. काका- बाबा गटाच्या संघर्षाला ज्यांच्यामुळे सुरूवात झाली, ती मंडळी दोन्ही गटांतून बाहेर पडली आणि काका- बाबा गटाच्या मनोमिलनाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गटांचे सैन्य खांद्याला खांदा लावून लढले. यादरम्यान, पृथ्वीराज बाबांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मलकापूर नगरपालिका आणि 2019 ची विधानसभा या निवडणुकांत काका गटाने बाबा गटाला मदतच केल्याची चर्चा आहे.
आमदार मिळण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्साह
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयात काका गटाने किंगमेकरची भूमिका बजावल्याची चर्चा होती. कराड, मलकापूर सोडून बाहेरची मतविभागणी करण्यासाठी पृथ्वीराजबाबांनी ऍड. उदयसिंह पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला आणि विधान परिषदेच्यावेळी उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल, असा शब्दही दिल्याची चर्चा होती. काका- बाबा भेटीने या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे. जिल्ह्याला अजून एक आमदार मिळणार या चर्चेने काका- बाबा गटात उत्साहाचे वातावरण आहे.