नवी दिल्ली – गोव्यातील एका तुरूंगात दसरा (Dasara) साजरा करण्यासाठी तुरुंगातील कैद्यांनी पारंपारीक पद्धतीने रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. (Ravan Dahan) पण त्याची शिक्षा मात्र कारागृहातील अधिकाऱ्यांना भोगावी लागली असून चार अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. कैदी रावण दहन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर (video viral) समोर आल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
गोव्यातील कोलवळे (colavale jail) मध्यवर्ती कारागृहात (Goa jail) हा प्रकार घडला. कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी संलग्न सहायक अधीक्षक चंद्रकांत हरिजन, तुरुंगाधिकारी महेश फडते आणि अनिल गावकर तसेच सहायक तुरुंगाधिकारी रामनाथ गौडे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कारागृहाच्या आवारात रावणाच्या पुतळ्याचे दहन करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे समजते. दसरा उत्सवात रावणाचे पुतळे जाळणे ही भारतभरात एक सामान्य प्रथा आहे. यावर्षी विजयादशमी म्हणून ओळखला जाणारा दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. (Ravan dahan in jail)
कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कैद्यांना पुतळा बनवण्याची परवानगी कशी देण्यात आली याचे उत्तर तुरुंग अधिकाऱ्यांना द्यावे लागेल. कारागृहात मोबाईल कसा आला याचीही चौकशी केली जाईल, असे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.