नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे दाखल झाले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. औपचारिक स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याने भारत- फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या रौप्यमहोत्सवाचेही औचित्य साधले आहे.
दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. “डीएसी’ने 26 राफेल सागरी विमानांच्या खरेदीसाठी मंजूरी दिली.आंतर-सरकारी कराराच्या आधारे फ्रेंच सरकारकडून भारतीय नौदलासाठी संबंधित सहाय्यक उपकरणे, शस्त्रे, सिम्युलेटर, सुटे भाग, संबंधित दस्तावेज, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि दळणवळण सहकार्य केले जाणार आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे बांधण्यात येणार्या तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदीसाठी परिषदेने मंजूरी दिली. याशिवाय, भांडवल संपादन प्रकरणांच्या सर्व श्रेणींमध्ये इच्छित स्वदेशी भाग राखणे साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या प्रस्तावालाही “डीएसी’ने मंजुरी दिली.