उडपी – हलगीचा आवाज… मध्यभागी ठेवलेल्या दारूच्या मोठ्या बाटलीला मोगऱ्याच्या गजरांचा हार घालून तिची चाललेली आरती. हे चित्र आहे कर्नाटकच्या उडपी या शहरातील. कर्नाटकमध्ये मद्याच्या किमती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर तेथील मद्यप्रेमींनी हे अजब अंदोलन केले आहे.
तर, झाले असे की, कर्नाटकच्या नवनिर्वाचित सिद्धरामय्या सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय बनावटीच्या विदेशी दारुच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्नाटक सरकारला येत्या वर्षात 36 हजार कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. तसेच सरकारने बीअरवरचा अधिभारही 175 टक्क्यांवरुन 180 टक्क्यांवर आणला आहे.
आता सरकारने कोणतीही दरवाढ केली की त्यासंबंधीत संघटना एकवटतात आणि सरकारविरोधात निदर्शने करतात. पण मद्यप्रेमींची अशी कोणतीच संघटना नाही. मग करणार काय? म्हणूनच आता उडपीतील समस्त मद्यप्रेमींनी एकवटत सरकारविरोधात अंदोलनाचा नारा दिला. बरं ही मद्यप्रेमी मंडळी ऐवढ्यावरच थांबली नाहीत तर यांनी थेट सरकारलाच धमक्यावजा इशाराही दिला आहे.
जर सरकारने मद्याची दरवाढ त्वरित थांबविली नाही तर, “मद्य पिने कायमचे सोडून देऊ व अख्ख्या कुटुंबासकट तीर्थाटनाला जाऊ,’ असा धमकी वजा इशाराही त्यांनी दिला आहे. जर तसे झाल्यास सरकारच्या महसुलामध्ये घट होईल, असा कयासही त्यांनी बांधला आहे. विशेष म्हणजे या अंदोलनात मद्यपींनी सकाळ-संध्याकाळ 90चा एक पेग फ्री द्या अशाही घोषणा दिल्या आहेत.