बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण
मुंबई –चीनच्या व्हिवो कंपनीशी असलेला करार मोडल्यावर आयपीएलसाठी ड्रीम 11 या कंपनीशी बीसीसीआयने करार केला. या कंपनीतही चीनच्या काही कंपन्यांची गुंतवणूक असल्याचे दिसून आल्यावर पुन्हा एकदा टीका सुरू झाली असून या कंपनीशी झालेला करार केवळ यंदाच्या आयपीएल स्पर्धेपुरताच मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयच्या वतीने देण्यात आले आहे.
भारत व चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाल्यामुळे बीसीसीआयने व्हिवोशी असलेला करार मोडावा यासाठी दडपण येत होते. अखेर जनभावनेला प्राधान्य देत बीसीसीआयने हा करार संपुष्टात आणला व नवी निविदा प्रक्रिया केली. त्यात ड्रीम 11 या कंपनीने 222 कोटी रुपयांना हे हक्क विकत घेतले. मात्र, याही कंपनीत चिनी गुंतवणूक असल्याचे स्पष्ट झाल्यावर बीसीसीआयवर पुन्हा एकदा टीका होऊ लागली. अखेर हा करार केवळ यंदाच्या स्पर्धेसाठी असून त्यानंतर पुन्हा एकदा नव्या मोसमासाठी निविदा प्रक्रिया घेतली जाणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. व्हिवोकडून बीसीसीआयला प्रत्येक मोसमासाठी 440 कोटी रुपये मिळत होते.