पुणे – सतत भाव वाढ होत असल्याने डाळ खरेदीकडे ग्राहाकांनी पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम म्हणून तूर वगळता अन्य डाळींचे भाव घसरण्यास सुरुवात झाली आहे. हरभरा, मुग, मसूर आणि मटकी डाळीच्या भावात सध्या घट झाली. तर, उडीद डाळीचे भाव मात्र स्थिर आहेत. केवळ तूरडाळीच्या भावात वाढ नोंदवली गेली आहे.
याबाबतची माहिती व्यापारी विजय राठोड, अजितकुमार गुगळे आणि आशिष नहार यांनी दिली. डाळींचे भाव वाढण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तविण्यात येत होता. त्यामुळे अनेकांनी डाळी, कडधान्यांची खरेदी केली होती. मात्र, मागणी वाढलीच नाही. आता विक्रीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे डाळींच्या भावात घसरण सुरू झाली आहे.
मागील पंधरा दिवसांत मार्केट यार्डातील भुसार बाजारात हरभराडाळीच्या भावात क्विंटलमागे 500 ते 600 रुपये, मुगडाळीच्या भावात 300 ते 400 रुपये, मटकीडाळीच्या भावात 200 ते 400 रुपये आणि मसुर डाळीच्या भावात 100 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे. तर, तूरडाळीचे भाव क्विंटलमागे हजार रुपयांनी वाढले.