ज्ञानमार्ग म्हणजे समृद्धीचा मार्ग

शिक्षणाने मानवी जीवन व्यापलेले आहे. म्हणून पालक मुलांना शाळेत पाठवितात. तेथे मुलांना ज्ञान मिळावे असा पालकांचा उद्देश असतो. तो ज्ञानी व्हावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा असे पालकांना वाटते. त्याने स्वत:च्या पायावर उभे राहावे, निरनिराळी कौशल्ये आत्मसात करून अर्थार्जन करावे हा ही उद्देश असतो. म्हणून आपण शाळेला ज्ञानमंदिर म्हणतो. पण ज्ञान मिळवणे म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे एखाद्या विषयाचे आकलन होणे. माहिती मिळवणे, अनुभव घेणे, जाणतेपण येणे. ज्ञान म्हणजे माहिती आणि अनुभव यांची प्रचिती. उदाहरणार्थ साखर गोड आहे ही माहिती आणि साखर खाल्ल्यानंतर त्याच्या गोडीचा अनुभव येणे ही झाली प्रचिती. असे प्रचितीचे ज्ञान फक्‍त वर्गातच मिळते असे नाही. तर ते वर्गाबाहेरही मिळते. ज्ञान घरात मिळते, शाळेत मिळते, समाजात मिळते आणि सृष्टीतही मिळते. ज्ञान संपादन ही अखंड चालणारी क्रिया आहे. तिला वयाचे बंधन नाही तसे काळाचेही बंधन नाही म्हणूनच ग. दि. माडगूळकरांनी सृष्टीरूपी शाळेबद्दल म्हटलंय-
“”बिनभिंतीची शाळा इथली
लाखो इथले गुरु
झाडे वेली पशु पाखरे
यांशी दोस्ती करू।।”
ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञानसंपादन
डोळे, कान, जीभ, हात, त्वचा ही माणसाची ज्ञानेंद्रिये आहेत. या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून माणूस ज्ञान मिळवतो. डोळ्यांनी तो जसा पुस्तक वाचतो तसा सृष्टीचेही वाचन करतो. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करतो. डोळे हे ज्ञान संपादनाचे जणू इंद्रिय आहे. म्हणून आपण त्याला “ज्ञानचक्षू’ असेही म्हणतो. डोळ्याबरोबर कानांनी ऐकणे या माध्यमातूनही ज्ञानप्राप्ती होते. शाळेतून दिले जाणारे ज्ञान हे मुख्यत: श्रवणातूनच दिले जाते. पूर्वीची माणसे शाळेत जात नव्हती तरीही ती देवळात जाऊन भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून शिकतच होती. तसेच जिभेच्या माध्यमातून विविध रसांचे ज्ञान होते म्हणूनच एखाद्या पदार्थाची चव घेऊन आपण आपले मत प्रकट करतो आणि म्हणतो गूळ गोड असतो, कारले कडू असते, चिंच आंबट असते, आवळा तूरट असतो आणि मिरची तिखट असते. त्वचेच्या माध्यमातूनही आपणाला स्पर्श ज्ञान होते. म्हणूनच उन्हाचा चटका लागताच आपण सावलीचा आश्रय घेतो आणि थंडगार झोंबरा वारा अंगाला झोंबू लागला की स्वेटरची आठवण होते. माणूस हाताने काम करतो आणि ज्ञान मिळवतो. शाळेत वहीवर लिहिणे, चित्र काढणे, मातीची मूर्ती बनविणे यासाठी हाताचा वापर करावा लागतो. तसेच प्रयोग शाळेत प्रयोग करणे, बागकाम करणे, जमीन खोदणे यासाठीही हात या ज्ञानेंद्रियाचा वापर करावा लागतो. या पंचज्ञानेंद्रियांबरोबर एक अमूर्त, अदृश्‍य अशरीर ज्ञानेंद्रिय आहे. त्याच्या माध्यमातूनही प्रचंड ज्ञान प्राप्त करता येते. त्या अशरीर ज्ञानेंद्रियाचे नाव आहे “मन’ या मनाची शक्‍ती अगाध आहे. मन:सामर्थ्याने ज्ञान संपादन करणे याला ज्ञान मनोमय करणे म्हणतात. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी “ज्ञान संपादन करणे म्हणजे डोळ्यांनी वाचणे, कानांनी ऐकणे, हातांनी लिहिणे, मनाने जाणणे आणि ज्ञान मनोमय करणे होय’ अशी व्याख्या केली आहे.
ज्ञानाची व्याप्ती
ज्ञान अमाप आहे. त्याची मोजदाद करता येत नाही. म्हणून न्यूटन या शास्त्रज्ञाने नम्रपणे असे म्हटले आहे की, “”समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूच्या असंख्य कणांइतके ज्ञान अगाध आहे. माझ्याकडे फक्‍त यातील एका कणाऐवढे ज्ञान आहे.” आपण वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये गेलो आणि तेथील विविध विषयांवरील फक्‍त पुस्तके पाहिली तरी ज्ञान किती अगाध आहे याची कल्पना येते. बरे एका जन्मात किती विषयांचे किती ज्ञान संपादन करणार? विज्ञान, साहित्य, संगीत, संगणक, नाट्यशास्त्र, शरीरविज्ञान, आहारशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, व्याकरणशास्त्र, गणित, अवकाश विज्ञान, अणु विज्ञान असे कितीतरी मानवी जीवनाशी संबंधित अभ्यासाचे विषय आहेत. साठ सत्तर वर्षांच्या आयुष्यात माणूस किती विषयांचा अभ्यास करणार? म्हणून माणसाने आदर्श नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्‍यक तेवढे सर्वसाधारण ज्ञान प्राप्त करावे आणि कुटुंब चालविण्यासाठी आपल्या आवडीच्या विषयाचे ज्ञान संपादन करून समाजाची सेवा करावी.
व्यासंग म्हणजे काय?
विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक केलेल्या वाचनाला व्यासंग म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कथा कादंबऱ्या वाचत बसले नाहीत. तर भारतीय समाजव्यवस्थेतील जातीचे प्रस्थ आणि त्याचं निर्मूलन या संबंधीचे मूलगामी वाचन आणि चिंतन करीत राहिले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि आध्यात्म या विषयांच्या अनुषंगाने वाचन, मनन केले. म्हणून ते महत्पदाला पोहोचले. याचे कारण होते त्यांचा व्यासंग! विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक केलेला अभ्यास.
ज्ञानसंपादनाचे फायदे
ज्ञान संपादन केल्यामुळे कितीतरी लाभ मनुष्याला प्राप्त होतात. त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचा विकास होतो. त्याला विविध कौशल्ये प्राप्त होतात. तो स्वावलंबी होतो. आत्मनिर्भर होतो. त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण होतो. त्याची भाषिक कौशल्ये तर विकसित होतातच पण शब्दशक्‍तीही वाढते. तो भाषण आणि संभाषण करून स्वत:ची मते ठामपणे मांडू शकतो. त्याच्या विचारांना वळण तर लागतेच पण विचारांत स्पष्टता येते. त्याचे मनोबल वाढते. त्याची कल्पनाशक्‍ती, विचारशक्‍ती, तर्कशक्‍ती, स्मरणशक्‍ती विकसित होते. त्याला जीवनाचा अर्थ बऱ्यापैकी उमगलेला असतो आणि कशासाठी जगायचे याचे भान आलेले असते. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत सर्वांगाने ज्ञान मिळवून समृद्ध व्हावे. “ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही’ ज्ञान हा तिसरा डोळा आहे.

डॉ. दिलीप गरुड

Leave A Reply

Your email address will not be published.