नवी दिल्ली – युक्रेनमधील खार्किव शहरात 21 वर्षीय भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाची रशिया चौकशी करेल, असे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी म्हटले आहे.
खार्किव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये चौथ्या वर्षाच्या वैद्यकीय शाखेत शिकत असलेला विद्यार्थी नवीन शेकरप्पा हा मंगळवारी त्या शहरावर रशियाकडून झालेल्या जोरदार बॉंम्बफेकीमध्ये ठार झाला आहे. या घटनेविषयी भारतातून मोठाच आक्रोष व्यक्त केला गेला आहे. अलीपोव्ह यांनी याची दखल घेत आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले.
युक्रेन मधील तीव्र संघर्ष सुरू असलेल्या भागात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी रशिया शक्यतो सर्व प्रयत्न करेल आणि या दुर्दैवी घटनेची योग्य चौकशी होईल ते म्हणाले. नवीन हा कर्नाटकातील चालगेरी गावचा रहिवासी होता.
मंगळवारी रात्री भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की नवीनच्या मृतदेहाची ओळख पटली आहे आणि तो विद्यापीठातील शवागारात नेण्यात आला आहे. भारतीय अधिकारी त्याचे पार्थिव परत आणण्यासाठी खार्किवमधील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत.