नवी दिल्ली – भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ आघाडीने (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार असतील. त्यांची लढत विरोधकांचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्याशी होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येथे भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून 64 वर्षीय मुर्मू यांचे नाव निश्चित करण्यात आले.
त्या निवडणुकीसाठीचे मतमूल्य विचारात घेता एनडीएची स्थिती मजबूत मानली जात आहे. त्यामुळे मुर्मू यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे चित्र आहे. मुर्मू विजयी झाल्यास देशाचे राष्ट्रपतिपद भुषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरतील.