टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
स्पर्धेचे काउंटडाऊनही सुरु झाले आहे. मात्र, खर्च वाढला असला, तरी आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यांनी नव्याने तयारीला सुरवात केली आहे. कामाला सुरवात केल्यावर आयोजकांनी पहिल्या टप्प्यात उदघाटन आणि समारोप सोहळ्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केल्याचे जाहिर केले. आता या दोन्ही सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी या नव्या समितीवर असेल. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. कामात म्हणावी तशी प्रगती झालेली नसली तरीही येत्या काळात या तयारीलाही वेग येणार आहे.
ही स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार होती. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे बहुतेक सर्वच क्रीडा स्पर्धांचे आंतरराष्ट्रीय नियोजन विस्कळीत झाले. आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे संयोजक आणि सरकार यांनी खर्चास कात्री लावण्यास सुरवात केली आहे. स्पर्धा खेळाडू, प्रेक्षकांसाठी सुरक्षित आणि साधेपणाने घेण्याचा निश्चय आयोजकांनी केला आहे.
टोकियोमध्येही सातत्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. आत्ताच ही संख्या दहा हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे स्पर्धा होणार की नाही, खर्च करायचा की नाही, तयारी ठेवायची की नाही या सगळ्याबाबत डोक्यावर टांगती तलवार मात्र, कायम आहे.