पाथर्डी – श्री क्षेत्र मोहटादेवी येथे शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मोहटादेवी गड भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने गडाचे सौंदर्य निसर्गाच्या कृपेने चांगलेच बहरले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, संस्थानचे विश्वस्त ऍड. अशोक पाटील, ऍड. प्रसन्न दराडे, भास्करराव सांगळे, गोरक्षनाथ ओव्हळ,शिवाजी पालवे, राजेंद्र भंडारी, अरुण दहिफळे, रामदास पालवे, सुनीता राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यासह देवस्थानचे सर्व कर्मचारी नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी कार्यरत आहेत.
देवीच्या साडेतीन शक्ती पिठांपैकी श्री क्षेत्र माहुरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची राज्यभर ख्याती आहे. चौंसष्ट योगिनी, अष्ट भैरव व दश महाविद्यांच्या मूर्ती श्री यंत्राकार दर्शन रांगेत स्थापित असून असे स्थान राज्यात एकमेव आहे. देशातील मोठ्या मंदिरांपैकी तीन नंबरचे मंदिर हे मोहटादेवीचे गणले जाते. पहिल्या माळेपासून ते सातव्या माळेपर्यंत पायी चालत येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असून भाविकांच्या सुरक्षेसाठी परिसरात, दर्शन रांगेत व गाभाऱ्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गेल्यावर्षी नवरात्रात देवस्थान समितीला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला.
यंदा मात्र जोरदार पाऊस झाल्याने देवीगडाच्या जवळ असणाऱ्या तलावात, मोहरी तलाव, मोहटे गाव तलाव यासह छोट्या-मोठ्या नाल्यात बऱ्यापैकी पाण्याचा साठा आहे. त्यामुळे पाण्याची मुख्य समस्या दूर झाली आहे. तसेच गडाच्या परिसरातील डोंगरावर देवस्थान समितीच्या पुढाकारातून झालेले वृक्षारोपण पूर्णपणे यशस्वी झाले आहे. दाट झाडीने मंदिर परिसराचे सौंदर्य चांगलेच खुलले आहे. तसेच मंदिरावरील विद्युत रोषणाईमुळे मंदिराची आकर्षकता आणखी वाढली आहे. मोहटादेवी फाटा ते देवी गडापर्यंत चौपदरी रस्त्याचे काम ठेकेदाराने अवघ्या दीड महिन्यात पूर्ण केल्याने रस्त्याची समस्या सुटली आहे. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच घटी बसवणाऱ्या महिलांसाठी व कीर्तनासाठी वाटरप्रूप मंडप तयार करण्यात आले आहेत.