वाघोलीत कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी अटीवर जागा – जिल्हाधिकारी

दोन महिन्यांत प्रकल्प सुरू करा;अन्यथा जागा परत घेणार

वाघोली – वाघोलीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्‍यक शासकीय जागा अटी, शर्थींवर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. जागा दिल्यानंतर दोन महिन्यांत कचरा प्रक्रिया प्रकल्प अहवाल तयार करून प्रकल्प सुरू करावा; अन्यथा जागा पुन्हा जमा करून घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.

वाघोलीच्या प्रश्‍नाबाबत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना यामध्ये आवश्‍यक कार्यवाहीसाठी मदत करण्याच्या सूचना बुधवारी (दि.24) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. वाघोलीच्या विविध प्रश्‍नांबाबत जिल्हाधिकारी राम यांनी 10 दिवसांपूर्वी वाघोली ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन कचरा प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर शासकीय जागा तात्काळ देण्यासाठी सहमती दर्शविली होती. यासंदर्भात पुन्हा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार बाबुराव पाचर्णे, अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बैठक झाली.

प्रकल्पासाठी आगाऊ जागेची गरज असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी आवश्‍यक जागा अटी व शर्थींवर देण्यासाठी अनुमती दिली आहे. जागा दिल्यानंतर ग्रामपंचायतीने दोन महिन्यांत कचरा प्रक्रिया प्रकल्प अहवाल तयार करून कचरा प्रकल्प सुस्थितीत चालू करावा. जर कचरा प्रकल्प झाला नाही तर दिलेली जागा पुन्हा जमा करून घेण्यात येईल, अशी प्रमुख अट जागा देताना असणार आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा दिल्यानंतर काही अडचण आली किंवा तांत्रिक अडचणीत बंदोबस्ताची गरज असेल तर तर पुढील कार्यवाहीसाठी बंदोबस्त दिला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

प्रकल्पाची कार्यवाही झाली नाही तर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. पुढील दोन दिवसामध्ये महसूल विभागाच्या अहवालानुसार अटी व शर्थींवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागेसंदर्भात आदेश निघण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी यासाठी लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. यावेळी आमदार पाचर्णे, उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, महसूल तहसीलदार प्रशांत आवटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, हवेलीचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव, महेंद्र भाडळे, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते, माजी उपसरपंच समीर भाडळे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)