महाबळेश्वर – महाबळेश्वर येथे माहेरी आलेल्या 29 वर्षे वयाच्या गर्भवती महिलेच्या करोना चाचणीचा अहवाल बुधवारी (दि. 10) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. पालिका प्रशासनाने या महिलेस घरानजीक एका खोलीत होम क्वारंटाइन केले होते. तिच्या घशातील स्रावाचा नमुना मंगळवारी (दि. 9) घेण्यात आला होता. ती करोनाबाधित झाल्याने तिला बुधवारी रात्रीच पाचगणी येथे कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कांदिवली (मुंबई) येथून ही महिला, पतीसोबत एका गाडीतून सोमवारी (दि. 8) महाबळेश्वर येथे आली होती. त्यांच्यासोबत गाडीचा चालकही होता. महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली होती. तिला महाबळेश्वरमध्ये सोडून पती त्याच गाडीतून मुंबईला गेला होता. त्यामुळे पती व गाडीचालकाशी स्थानिक प्रशासनाने संपर्क साधून त्यांनादेखील मुंबईत करोनाची चाचणी करून घ्यायला सांगितले आहे. या महिलेचे नातेवाईक मुख्य बाजारपेठेपासून दोन किमी अंतरावर एक बंगल्याच्या बाजूला राहतात.
पालिका प्रशासनाने या महिलेस घरानजीकच्या खोलीत क्वारंटाइन केले होते. या महिलेच्या संपर्कातील तीन ते चार जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून तर 30 जणांना लो रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. ही महिला राहत असलेल्या परिसरात पालिकेच्यावतीने गुरुवारी जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली. लोकांनी बाजारपेठेत विनाकारण गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.