पिंपरी (प्रतिनिधी) – उरूळी देवाची (जि. पुणे) येथील 82 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा गुरुवारी (दि. 11) सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर, रुग्णालयामध्ये आज आणखी 7 करोना बाधित रुग्णांची भर पडली.
करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये थेरगाव-बेलठिकानगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन महिला आणि एक 10 वर्षाचा मुलगा आहे. त्याशिवाय, बोपोडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ पुरुष, कडधे (ता. मावळ) येथील 70 वर्षीय ज्येष्ठ महिला यांना देखील करोनाची लागण झाली आहे.
उरूळी देवाची आणि जुन्नर तालुक्यातील प्रत्येकी एका महिलेचा देखील करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. रुग्णालयामध्ये सध्या 30 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, आत्तापर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 46 जणांना उपचार करून घरी सोडले आहे.