हॉलीवूडचा गायक जस्टीन बीबरने अलीकडेच सोनोग्राफीच्या स्क्रीनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामध्ये गर्भातील नवजात बालकाचा फोटो दिसत आहे. त्याचबरोबर जस्टीनने पत्नी हेली बाल्डविनची डॉक्टरांकडून तपासणी होत असल्याचाही एक फोटो शेअर केला होता. हे दोन्ही फोटो बघून कोणालाही असेच वाटेल की हेली बाल्डविन प्रेग्नंट आहे. त्यामुळे अनेकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण “तुम्ही एप्रिल फूल झाला आहात.’ अशी कॉमेंट जस्टीनने खाली लिहीली आहे.
त्याची ही कॉमेंट वाचून त्याचे फॅन्स चांगलेच भडकले आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. “प्रेग्नन्सी हा काही एप्रिल फूल करण्याचा विषय होऊ शकत नाही.’ असे एकाने सुनावले तर ज्यांना मुले होंण्याचा संभव नाही किंवा ज्यांनी आपल्या नवजात बालकांना गमावले आहे, अशा दाम्पत्यांबाबत असंवेदनशीलता दाखवल्याबद्दल काहींनी जस्टीनला खडे बोल सुनावले आहेत.
फॅन्स भडकण्याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे जस्टीनने इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये अल्ट्रासाऊंड स्क्रीन इमेजमध्ये एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाखवले होते. अशा स्वरुपाचा घाणेरडा विनोद कोणालाही सहन होणार नाही,पत्नी हेलीबरोबरचे सर्व मतभेद संपुष्टात आले असून लवकरच पिता होण्याची ईच्छा जस्टीनने या पोस्टमधून व्यक्त केली होती. पण झाले उलटेच. एकतर त्याचे आणि हेली बाल्डविनमधील सारे काही आलबेल नाही, हे अलीकडेच सगळ्यांना समजून चुकले आहे. कॅलिफोर्नियातल्या लगुना बीचवर त्यांच्यात भांडण सुरू असल्याचा एक व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाला होता. तेंव्हा जस्टीन स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करायला लागला होता. हेली जस्टीनला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे जस्टीन बीबरने काही काळापूर्वीच मान्य केले होते. त्यासाठी तो स्वतःचे कौन्सिलिंगही करून घेत असे. या कामी हेली देखील त्याला सहकार्य करत असे.